Maharashtra Assembly Elections : मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती तसेच महाविकास आघाडी राज्यात जय्यत तयारी करताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections) भाजपने पहिल्या यादीत 99 उमेदवारांची घोषणा केली आहे. परंतु महायुती तसेच महाविकास आघाडीत अजूनही जागा वाटपाचा फार्म्युला निश्चित झालेला नाही. येत्या दोन ते तीन दिवसात दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपाचा फार्म्युला निश्चित होऊन उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच आता महायुती मधील मित्रपक्ष असलेल्या ‘राष्ट्रीय समाज पक्षा’च्या नेत्याने एक मोठं आणि धक्कादायक विधान केलंय.
महादेव जानकरांचा गंभीर आरोप
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते ‘महादेव जानकर’ यांनी महायुतीवर गंभीर आरोप केले आहेत. “आम्हाला महायुतीमधील पक्षाने विश्वासात घेतलं नाही, आम्हाला कोणत्याही जागांची चर्चा किंवा बैठकीला बोलावलं”, नसल्याची खंत त्यांनी व्यक्त करून दाखवली आहे। यासह महाविकास आघाडीमध्ये देखील सत्तेत जाणार नाही, आमचं काय होईल ? यासाठी आम्ही खंबीर असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यासह आता उमेदवार जाहीर केला तर उमेदवार पळून नेतील, असा आरोप करत त्यामुळे आम्ही 288 जागांपैकी 191 उमेदवारांची यादी जाहीर केल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
महायुती तसेच महाविकास आघाडीच्या विरोधात आक्रमक
महाराष्ट्रात ‘राष्ट्रीय समाज पक्ष’ नक्कीच खातं उघडेल असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला. यासह अजित पवारांची ‘बारामती’ देवेंद्र फडवणीस आणि विरोधात ‘नागपूर’ चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘कामठी’ या ठिकाणी महादेव जानकर प्रचारसभा घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले आहे. महाविकास आघाडीतील पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात देखील कराडमध्ये महादेव जानकर प्रचार सभा घेणार आहेत. यासह ते एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात देखील राष्ट्रीय समाज पक्ष उमेदवार देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मी आमदार करणारा माणूस
सुरुवातीपासून राष्ट्रीय समाज पक्षाला महायुतीमध्ये अधिकच्या जागा द्याव्यात, अशी मागणी महादेव जानकर यांनी लावून धरली होती. परंतु महायुतीकडून महादेव जानकर यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही, यावरून मी या निवडणुकीतून (Maharashtra Assembly Elections) कोणालाही सोडणार नाही, काँग्रेस आणि भाजप आम्हाला समान अंतरावर ठेवलेले आहे. दोन्ही पक्ष छोट्या पक्षांना खात आहे. मी आमदार करणारा माणूस आहे, त्यांच्याकडे भीक मागत बसू का ? असं म्हणत त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केलाय. यासह उद्याचं सरकार बनेल, त्यावेळी मला विचारल्याशिवाय मुख्यमंत्री होणार नाही, असा दावा देखील महादेव जानकर यांनी केलाय.
२३ नोव्हेंबरला लागणार विधानसभेचा निकाल
दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी येत्या 23 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्याचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. तर या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 22 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. 29 ऑक्टोबर पर्यंत उमेदवाराला अर्ज सादर करता येणार आहे. चार नोव्हेंबरला उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतो. त्यानंतर राज्यात कोणत्या मतदारसंघात कोणते उमेदवार रिंगणात आहेत ? यावर शिक्कामोर्तब होईल. त्याआधी राज्यात प्रचाराचा जोरदार धुराळा उडणार आहे.
महाविकास आघाडीचा आत्मविश्वास उंचावला
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीवर मोठा विजय मिळवला. राज्यातील 48 मतदार संघापैकी 31 मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून आलेत. त्यामुळे साहजिकच विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यात अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा करून महायुतीने राज्यात लोकांच्या बाबत सकारात्मक वातावरण तयार करण्यात यशस्वी झाले आहेत. परंतु या निवडणुकीत नेमका कोणता पक्ष ? सर्वात जास्त आमदार निवडून आणू शकतो आणि कोण मुख्यमंत्री होईल? याची प्रतीक्षा आता राज्यातील सगळ्याच लोकांना लागून राहिली आहे.