Devyani Farande : नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच काल विधानसभेसाठी भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये नाशिकमधील नाशिक पूर्व मतदार संघात ‘राहुल ढिकले’ यांना भाजपकडून पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. तर नाशिक पश्चिम या मतदार संघात ‘सीमाताई हिरे’ यांच्या नावावर शिक्कामोर्तेब केला आहे. मात्र नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार ‘देवयानी फरांदे’ (Devyani Farande) यांची उमेदवारी सध्या होल्डवर ठेवली आहे. त्यामुळे मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
भाजपने जाहीर केलेल्या यादीत नाशिक पुर्व मतदारसंघात अड राहुल ढिकाले, पश्चिम मध्ये सीमाताई हिरे, चांदवड-देवळा मतदारसंघातून डॉ. राहुल आहेर, तर बागलाणमधून दिलीप बोरसे या विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर केली होती. यातच नाशिक मध्य मतदारसंघातून उमेदवारी जाहीर न करता विद्यमान आमदार प्रा. देवयानी फरांदे यांना वेटिंगवर ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. देवयानी फरांदे यांनी उमेदवारीसाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र अजुनही उमेदवारीवरून सस्पेंसन्स कायम राहिला आहे.
महाविकास आघाडीकडून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. मागच्या २०१९ निवडणुकीत या मतदारसंघातून हेमलता पाटील यांनी निवडणूक लढवली होती. अलिकडेच पुन्हा उमेदवारी मिळावी, यासाठी हेमलता पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. तर याच जागेसाठी कॉंग्रेसकडून १५ जण इच्छूक आहेत. यात राष्ट्रवादी अजित पवार गटातील शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कॉंग्रेसचे आकाश छाजेड, डॉ. हेमलता पाटील, राहुल दिवे, शाहू खैरे, हनिफ बशीर. नितीन ठाकरे यांचा समावेश आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गीते यांनी देखील निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या आघाडीत मागच्या वेळी ही जागा कॉंग्रेसच्या वाट्याला गेली होती. मात्र यंदा ही जागा नेमकी कुणाला मिळणार ? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.