Maharashtra Police Bharati 2025 : सरकारी नोकरी मिळवण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. परंतु सध्याच्या काळात सरकारी नोकरी मिळवणं फार अवघड झालं आहे. यासाठी जे तरूण पोलिस भरतीची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकार आगामी २०२५ करीता फेब्रुवारी महिन्यानंतर १० हजार पदे भरणार आहे. प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अपर महासंचालकांनी सर्व पोलिस आयुक्त व ग्रामीणच्या पोलिस प्रमुखांकडून या भरतीसंदर्भात महत्वाचे संकेत दिले आहे. या रिक्त १० हजार पदांची माहिती मागवण्यात आली असून पुढच्या महिन्यात यासाठी जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्र पोलीस भरती २०२५
सध्या महाराष्ट्राची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. यासाठी पोलिसांचे मनुष्यबळ देखील अपुरे पडतांना दिसत आहे. त्यासाठी डिसेंबर २०२४ पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेण्यात आला. यानुसार अपर पोलिस महासंचालक यांनी सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधिक्षकांना याबाबत स्पष्ट शब्दात निर्देश दिले आहे. यानुसार या पोलिस भरतीचा मैदानीचा टप्पा साधारणत: पावसाळ्यापुर्वी पुर्ण होईल, यादृष्टीने योग्य नियोजन सुरू असल्याचे समजत आहे.
रिक्त पद भरण्यासाठी सूचना :
अपर पोलिस महासंचालकांनी मागविण्यात आलेल्या माहितीमध्ये रिक्त पदांची बिंदुनामावली अद्ययावत करणे, पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करणे, अनुकंपा तत्वावरील राखीव पदांची यादी तयार करणे, आंतरजिल्हा बदलीची पदे, प्रतिनियुक्तीवरील पदे, राखीव पोलिस बलाकडील रिक्त पदांची माहिती संकलित करणे, याचा आढावा घेण्यात आला आहे. तशा प्रकारे सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
मागच्या पोलिस भरतीसाठी १७ हजार पोलिस पदांसाठी (Maharashtra Police Bharati 2025) संपुर्ण महाराष्ट्रातून जवळपास १८ लाखांपर्यंत अर्ज प्राप्त झाले होते. यातच आता सोलापुर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, कोल्हापुर, सातार यासह इतर शहर-जिल्ह्यांची लोकसंख्या देखील वाढत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात ३०६ MIDC आहेत. यासाठी देखील सुरक्षितता वाढवी, यासाठी उद्योजक मागणी करतांना दिसत आहेत. तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नव्या पोलिस ठाणी स्थापन झाल्या आहेत. त्याकरिता देखील पोलिसांचे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची तारिख – लवकरच जाहिर करण्यात येईल.
पदांचे नाव –
मागच्या वेळी पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक, सशस्त्र पोलिस शिपाई, बॅण्डसमन, कारागृह शिपाई पदासाठी भरती घेण्यात आली होती. त्याआधारे खाली माहिती दिली आहे.
परिक्षा शुल्क :
अनु.क्र. | पदाचे नाव | खुला प्रवर्ग | मागासवर्गीय प्रवर्ग |
१ | पोलिस शिपाई | रू. ४५०/ | रू. ३५०/ |
२ | पोलिस शिपाई चालक | रू. ४५०/ | रू. ३५०/ |
३ | सशस्त्र पोलिस शिपाई | रू. ४५०/ | रू. ३५०/ |
४ | बॅण्डसमन | रू. ४५०/ | रू. ३५०/ |
५ | कारागृह शिपाई | रू. ४५०/ | रू. ३५०/ |
अर्ज प्रक्रिया : ( Maharashtra Police Bharati 2025 )
- पोलिस भरतीसाठी इच्छूक उमेदवारांना ‘ऑनलाईन’ पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.
- सर्वप्रथम उमेदवारांना भरतीसंदर्भात लागणारी सर्व कागदपत्र स्वत: जवळ ठेवणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 करीता संबंधित वेबसाईटवर जाऊन लॉगिन करणे.
- पोलीस भरतीसंदर्भात संपुर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचणे.
- कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे, तो निवडणे.
- आवश्यक सर्व माहिती योग्य भरणे, त्यानंतर कागदपत्रे अपलोड करून परिक्षा फी भरणे.
- अर्ज भरल्यानंतर संबंधित अर्जाची लगेचच प्रिंट काढून स्वत : जवळ ठेवणे.
- अर्ज सादर केल्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला SMS किंवा ईमेलद्वारे मैदाणी परीक्षा, तसेच इतर सर्व गोष्टींचे अपटेड मिळतील.
- त्यानंतर आपला प्रवेश पत्र डाऊनलोड करून त्यांची प्रिंट आणि संबंधित सर्व कागदपत्रे घेऊन परिक्षा केंद्रावर पोहचणे.
पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :
पोलीस शिपाई, पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई या पदांसाठी इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर पोलीस बॅन्डस्मन करीता इयत्ता 10 वी उत्तीर्ण ही शैक्षणिक अट ठेवण्यात आली आहे.
महिला उमेदवारांकरीता | पुरूष उमेदवारांकरीता | तृतीय पंथी ( ट्रान्सजेंडर) | |
अ) उंची | १५५ से.मी. पेक्षा कमी नसावी | १६५ से.मी. पेक्षा कमी नसावी. | अ) स्वत: ची लिंक ओळख महिला/तृतीय पंथी अशी केलेल्या व्यक्तीसाठी – १५५ से.मी. पेक्षा कमी नसावी.
ब) स्वत: ची लिंक ओळख पुरूष अशी केलेल्या व्यक्तींसाठी १६५ से.मी. पेक्षा कमी नसावी. |
ब) छाती | न फुगवता ७९ से.मी. पेक्षा कमी नसावी, व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक ५ से.मी. पेक्षा कमी नसावा. | स्वत: ची लिंग ओळख महिला/ पुरूष/तृतीय पंथी अशी केलेल्या व्यक्तीसाठी आवश्यक नाही. |
पोलीस भरतीची तयारी कशी करावी ?
पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी पोलीस भरतीची मैदाणी चाचणी खूप महत्वाची असते. कारण या भरतीसाठी ५० गुणांची शारीरिक चाचणी फार आवश्यक असते. यामध्ये धावणे, गोळा फेकणे अशा काही कवायती असतात. यात पुरूषांसाठी १६०० मीटर तर महिलांसाठी ८०० मीटरसाठी २० गुण ठेवण्यात आले आहेत. तर १०० मीटरकरीता पुरूष आणि महिलांसाठी १५ गुण ठेवण्यात आले आहे. ज्यांनी वेळेत हे अंतर पार केले. तर त्यांना पैकीच्या पैकी गुण मिळतात. त्यानंतर ते गुण हळूहळू कमी होत जातं. याचसोबत गोळाफेककरीता पुरूष आणि महिलांसाठी १५ गुण ठेवण्यात आले आहे, म्हणजे मैदाणी चाचणीसाठी ५० गुण तर लेखी परिक्षा करीता १०० गुण ठेवण्यात आले आहे.
शारीरिक परीक्षा :
पुरूष | महिला | गुण | |
धावणे | १६०० मीटर | 800 मीटर | 20 |
धावणे | १०० मीटर | 100 मीटर | 15 |
गोळाफेक | 15 | ||
एकूण | 50 |
लेखी चाचणी : शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळवणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १ : १० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील. उमेदवारांना लेखी परिक्षेमध्ये किमान ४० गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परिक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजले जातात. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येणार आहे. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे राहतील. मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परिक्षा घेण्याबाबचा दिनांक निश्चित करण्यात येईल.
लेखी परिक्षाकरीता विषय : –
अंकगणित :- यामध्ये उमेदवारांकरीता संख्याप्रकार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केवारी, सरळव्याज, सरासरी, लसावी-मसावी, गुणोत्तर प्रमाण, अपूर्णांक, काळ-काम-वेग, नफा-तोटा, वर्गमूळ, कोन, क्षेत्रफळावरील प्रश्न, चाकाच्या फेऱ्या. अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. यासाठी बाजारात विविध पुस्तके उपलब्ध आहेत. यातील कोणताही एक पुस्तक व्यवस्थित घेऊन त्याचा सराव केल्यास पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात.
सामान्य ज्ञान व चालु घडामोडी :- महाराष्ट्र, भारतातील ठिकाणं, नद्या, पर्वतरांगा, राजधान्या, ऐतिहासिक घटना, जगाचा भूगोल, राज्यघटना, चालू घडामोडी, नियुक्त्या, या बाबी व्यवस्थित वाचून गेल्यास जास्तीत जास्त गुण उमेदवारांना मिळण्याची दाट शक्यता असते.
बुद्धिमत्ता चाचणी :- यामध्ये प्रामुख्याने अक्षरमाला, सांकेतिक लिपी, अंकमालिका, दिनदर्शिका, बेन आकृती, नातेसंबंध, दिशा, कुटप्रश्न, व इतर घटकांचा समावेश केला जातो.
मराठी व्याकरण :- मराठी भाषा, उगम, शब्दांच्या जाती, वर्णमाला, समास, संधी, विभक्ती, अलंकार, म्हणी, वाक्चप्रचार, शुद्धलेखन, समानार्थी-विरूद्धार्थी शब्द, तसेच व्याकरणाच्या इतर गोष्टी व्यवस्थित अभ्यास करून गेल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.
पोलिस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे
- दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र,
- बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र,
- जन्म दाखला,
- रहिवाशी प्रमाणपत्र,
- जातीचे प्रमाणपत्र,
- जात-वैधता प्रमाणपत्र
- संगणक परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
टीप- पोलीस भरतीसाठी संबंधित उमेदवारांनी चांगली मेहनत करणे आवश्यक आहे. मैदाणी चाचणीसह लेखी परिक्षेची तयारी देखील महत्वाची आहे. याकरिता पोलीस भरतीसंदर्भात बाजारात विविध पुस्तके उपलब्ध आहेत. ते वाचणे गरजेचे आहे. त्याचसोबत इतर चालू घडामोडीसाठी दररोज वर्तमान पेपर असो किंवा न्यूज पोर्टेलवर जाऊन माहिती घेणे महत्वाचे आहे.
पोलीस भरतीसंदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न :
१ ) महाराष्ट्र पोलीस भरती २०२५ साठी जाहिरात कधी निघेल ?
- अपर पोलिस महासंचालक यांनी सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधिक्षकांना रिक्त पदांसंदर्भात निर्देश दिले आहेत. त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यात याभरतीसंदर्भात जाहिरात निघण्याची दाट शक्यता आहे.
२ ) या भरतीसाठी परीक्षा फी किती असणार ?
२०२४ साली झालेल्या पोलीस भरतीसाठी खुला प्रवर्गासाठी ४५० तर मागासप्रवर्गासाठी ३५० रूपये फी ठेवण्यात आली होती. त्यामुळे यंदा देखील तेवढीच फी आकारण्यात येईल.