Ravindra Chavan : नांदेड : नांदेडचे दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर आता नांदेड लोकसभा पोटनिवडणूकीत रविंद्र चव्हाण यांचे नाव समोर येत आहे. काही महिन्यांपुर्वी वसंत चव्हाण यांचं निधन झालं. त्यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. याठिकाणी राज्याची ज्यावेळी विधानसभा निवडणूक होईल, त्यावेळी याठिकाणी पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. यासाठी आता कॉंग्रेस पक्षाकडून वसंत चव्हाण यांचे चिरंजीव रविंद्र चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तेब करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
लोकसभा पोटनिवडणुकीत रविंद्र चव्हाण यांच्या नावाचा ठराव मंजूर
वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘चला साहेबांचे स्वप्न पुर्ण करूया’, या शोकसभांच्या अंतर्गत रविंद्र चव्हाण यांनी मतदारसंघात नागरिकांशी चर्चा करण्यास सुरूवात केली आहे. यातच नायगाव विधासभा मतदारसंघात आले असता याठिकाणी पोटनिवडणूकीसाठी रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या नावाचा ठराव पारित करण्यात आला. याला कॉंग्रेसच्या सर्व स्थानिक नेत्यांनी एकमताने मंजूरी दिली.
यावर बोलतांना रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) म्हणाले की, मागील एक महिन्यापुर्वीच नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटीने माझ्या नावाचा ठराव लोकसभेसाठी घेतलेला आहे. तसा ठराव महाराष्ट्र प्रदेशकडे पाठवला आहेचत. आज खरंतर नायगाव मतदारसंघ हा स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेबांचा होम ग्राऊंट मतदारसंघ आहे. बऱ्याच दिवसानंतर आम्हाला याठिकाणी कार्यक्रम घ्यायचा होता. बाकी तालुक्यांमध्ये सगळीकडे शोकसभा घेतली. आता सर्वांची इच्छा म्हणून आम्ही याठिकाणी सभा घेतली. आज सर्व कार्यकर्त्यांच्या नायगावमध्ये शोकसभा घेतल्याचे रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
अलिकडेच भाजपमधून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले भास्करराव खतगावकर आणि मीनल खतगावकर यांची सध्या कॉंग्रेसच्या कार्यक्रमांना अनुपस्थिती दिसत आहे. त्यावर बोलतांना ते म्हणाले की, अलिकडेच त्यांचा कॉंग्रेसमध्ये मुंबईत प्रवेश झाला आहे. आता दुसरा एक मोठा जिल्ह्यात कार्यक्रम घेऊन त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा याठिकाणी होईल. यातच त्यांचे फोटो देखील वापरण्याचे आम्हाला सूचना देण्यात आल्या आहेत. असेही त्यांनी म्हटलं.
पोटनिवडणुक बिनविरोध होणार की लढत ?
२०२४ साली कॉंग्रेसकडून वसंत चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला. त्याआधी नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण, भास्करराव खतगावकर यांनी मतदारसंघांचं प्रतिनिधित्व केले आहे. यातच आता वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर महायुतीकडून पोटनिवडणूकीत पुन्हा प्रतापराव पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिली जाणार की ही निवडणूक बिनविरोध होणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
वसंत चव्हाण यांचा राजकीय प्रवास
१५ ऑगस्ट १९५४ रोजी जन्मलेले वसंत चव्हाण यांना राजकारणाचे बाळकडू त्यांचे वडील बळवंतराव चव्हाण यांच्याकडूनच मिळाले. १९८७ साली ते नायगावचे सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग २४ वर्षे ते या पदावर होते. १९९० मध्ये जिल्हा परिषद सदस्य, २००२ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून पहिल्यांदा विधानसभेत पोहचले. तर २००९ मध्ये अपत्र आणि २०१४ मध्ये कॉंग्रेसकडून त्यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत त्यांनी तत्कालीन भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव करून खासदार झाले. मात्र दोन महिन्यानंतरच त्यांचा निधन झालं.