“मग बीडमध्ये पोलिसांना लकवा मारला आहे का ?”वडेट्टीवारांचा संतापजनक सवाल

Santosh Deshmukh

Santosh Deshmukh : बीड : वाल्मीक कराड महायुती सरकारचा जावई आहे का ?  सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही ? परभणी मध्ये भीमसैनिकांवर कारवाई करताना पोलिस आक्रमक होती, बीडमध्ये कारवाई करताना आता पोलिसांच्या हाताला लकवा मारला आहे का? असा संतप्त सवाल राज्याचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारला केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरण चर्चेत आले आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे वाल्मिक कराड हे मुख्य आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे. घटना झाल्यापासून वाल्मिक कराड फरार असून आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. अशातच आता विजय वडेट्टीवार यांनी देखील या प्रकरणावरून संताप व्यक्त करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, सरपंच ‘संतोष देशमुख’ यांना न्याय मिळावा म्हणून इतका मोठा मोर्चा निघाला.  पण त्यानंतर देखील सरकार जागे झाले नाही. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून ‘धनंजय मुंडे’ यांचा राजीनामा घेतला पाहिजे.  त्याशिवाय न्याय मिळणार नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडला अजून अटक होत नाही. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सूत्रधाराला अटक करू, आरोपींवर मकोका लावू अश्या मोठ्या घोषणा केल्या.  पण अजून अटक का होत नाही? असाही सवाल त्यांनी केला आहे.

दरम्यान,  वाल्मीक कराड हा सरकारचा जावई आहे का ? असा सवाल आज माझ्यासह महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. बीडमध्ये बिहार सारखी परिस्थिती झाली आहे. अनेक जमिनी लुटल्या, खंडणी मागितली जातात, महिलांवर अत्याचार होतात. ‘संतोष देशमुख’ यांच्या हत्येसारखे प्रकरण होऊन पोलीस वाल्मीक कराडला अटक का करू शकत नाही. परभणीमध्ये भीमसैनिकांवर कारवाई करताना पोलिसांना धार येते मग बीडमध्ये पोलिसांना लकवा का मारला आहे ? संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचा अमानुषपणे खून झाला, त्यांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाही. वाल्मीक कराडची नार्को टेस्ट झाली पाहिजे.आतापर्यंत बीड मध्ये झालेल्या हत्या, खंडणी, महिला अत्याचार सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.