“आदिवासींच्या जमीनी कोण हडप करतंय? कलेक्टरला कुणी पत्र पाठवलं”

J P Gavit

J P Gavit : कळवण : कळवण सुरगाणा भागाचे आमदार नितीन पवार यांनी कलेक्टरला पत्र लिहिलं. काय पत्र लिहिलं? की या ठिकाणी जो काही वन जमिनीचा प्रश्न आहे. या वन जमिनी काही लोक हडप करतायेत म्हणून त्यांच्यावर सक्त कारवाई करा. आज कोण या जमिनी हडप करतंय? या जमिनीचे जतन कोणी केले आहे? सबंध महाराष्ट्राचा ज्या ज्या ठिकाणी फॉरेस्ट आहे त्या भागामध्ये तुम्ही चक्कर टाकली, माहिती काढली. तर आज या राज्यामध्ये या देशामध्ये जे जंगल वाचतंय ते केवळ आदिवासींमुळे वाचतंय दुसरा कोणीही ते जंगल वाचवलं नाही. म्हणून आम्ही नेहमी सांगतो जल, जंगल आणि जमीन ही शेतकऱ्यांना, देशाला, राज्याला आदिवासींकडून एक प्रकारची देण आहे. ते काम या ठिकाणी होत असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे. असा हल्लाबोल शरद पवार यांनी विरोधकांवर केला.

जीवा पांडू गावित यांचं शरद पवारांकडून कौतूक

कळवण सुरगाणा मतदारसंघाचे उमेदवार जे.पी. गावित (J P Gavit ) यांच्यासाठी शरद पवारांची कळवण येथे प्रचार सभा पार पडली. त्यावेळी त्यांनी आमदार नितीन पवार यांच्यावर जोरदार प्रहार केला. पुढे बोलतांना ते म्हणाले की, या ठिकाणचा विरोधी जो आमदार आहे. तो पत्र लिहितो की, आदिवासींनी या ठिकाणी जमीन घेतली असेल तर ती त्यांच्याकडून काढून घ्या, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. मला आनंद आहे की, हा प्रश्न आणि त्यासंबंधीची जागृती करण्यासाठी कॉ. गावित यांनी इथून मुंबईपर्यंत पदयात्रा काढली. सबंध देशाचे लक्ष तुम्हा लोकांकडे गेलं. हा जो मोर्चा होता तो अभूतपूर्व असा मोर्चा होता.

त्या मोर्चाच्या माध्यमातून राज्य सरकारला, राज्याच्या सगळ्या प्रमुख राजकीय पक्षांना, वृत्तपत्रांना, टेलिव्हिजनला एक प्रकारचं जागृती करण्याचे काम कॉ. गावित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं आणि आदिवासींच्या मालकीची जी काही जमीन असेल ती त्यांच्या पदरात घेण्याचा त्यांचा अधिकार आहे. हा विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडला. मी त्यांचे अंतःकरणापासून अभिनंदन करतो की, तुम्ही त्या कष्टकऱ्यांची जमीन वाचवण्यासाठी संघर्ष करताय. त्या तुमच्या संघर्षाच्या पाठीशी उभं राहणं आम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ती आम्ही पार पाडल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा देखील त्यांनी दिला.

ते लोक आदिवासींना आदिवासी म्हणत नाहीत

पुढे बोलतांना ते म्हणाले की, आज ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांचा आदिवासींकडे बघण्याचा दृष्टिकोन हा चमत्कारिक आहे. ते आदिवासींना आदिवासी म्हणत नाहीत, वनवासी म्हणतात. हा वनवासी शब्द आला कुठून? काल सबंध वनवासीचा हा आमचा आदिवासी, आदिवासी आहे, जंगलाचा रक्षक आहे, कष्ट करणारा आहे, शेती करणारा आहे, समाजाच्या हिताची जपणूक करणारा आहे आणि म्हणून त्याला वनवासी म्हणून एका वेगळ्या दिशेला नेण्यासंबंधीचे पाऊल आज राज्यकर्ते टाकत असतील ही गोष्ट आम्ही कदापी मंजूर करणार नाही. त्यादृष्टीने आज कॉ. गावीत अखंडपणाने काम करत आहेत. मला ठाऊक आहे,  मी राज्याचा प्रमुख होतो त्या काळामध्ये सुद्धा कॉ. गावीत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये होते. त्या सगळ्या कामांमध्ये एक वेळेस सुद्धा या गृहस्थांनी व्यक्तिगत काम आम्हाला कधी सांगितलं नाही. जे काही प्रश्न मांडले ते आदिवासींचे मांडले, आया बहिणींचे मांडले, बेरोजगार तरुणांचे मांडले, शेतकऱ्यांचे मांडले, विकासाच्या संदर्भातले मांडले.

शिवाजी महाराज पुतळ्याचे काम अर्धवट

आज मी येताना शिवछत्रपतींचा पुतळा पाहिला आणि मला लक्षात आलं की, याच्या उद्घाटनाला मला बोलावलं होतं. मी स्वतः आलो होतो आणि त्या वेळेला ज्या प्रकारची रोषणाई त्या ठिकाणी केली. त्यामुळे त्या पुतळ्याचे खरे स्वरूप आम्हाला काही बघता आलं नाही. पण अश्वारूढ शिवाजी महाराजांचा उंच पुतळा हा त्या ठिकाणी अवश्य दिसला. आज येताना मी बघितलं त्या पुतळ्याचे काम अर्धवट राहिलेला आहे, त्याच्या कामामध्ये काहीही प्रगती झाली नाही.

छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे दैवत, या देशाच्या प्रत्येक माणसाला अभिमान वाटावं अशा प्रकारचे हे होतं. एकादृष्टीने युगपुरुष युगायुगामध्ये असं कर्तुत्व असलेली व्यक्ती जन्माला येत नाही. ती जन्माला या राज्यात आली आणि म्हणून तुम्हाला मला त्यांचा अभिमान आहे. म्हणून त्यांचा पुतळा केला तर आनंद आहे. पण पुतळा केल्यानंतर ते काम अर्धवट ठेवणं ही शिवछत्रपतींची अप्रतिष्ठा आहे. त्यासाठी जे जे जबाबदार असतील. त्या सगळ्यांकडे आपल्याला एका वेगळ्या पद्धतीने बघावे लागेल.

हे काम दुरुस्त कसे होईल? व्यवस्थित कसे होईल? याचा विचार आपल्याला करावा लागेल. त्यासाठी या निवडणुकीनंतर प्रमुख लोकांनी बसावं आणि हे अर्धवट काम योग्य रस्त्यावर न्यावं. त्याला काही शासकीय अडचणी असतील ते आम्हा लोकांच्या कानावर घालावं. शिवाजी महाराजांना बेज्जत करण्याचे काम या ठिकाणी झाले ते दुरुस्त करायचं आहे हे मुद्दाम मी आग्रहाने या ठिकाणी सांगू इच्छितो असेही ते म्हणाले.

दरम्यान, कॉ. गावीत यांना तुम्हा मत द्या. या मताच्या जोरावर राज्यामध्ये सत्तेचे परिवर्तन आपण करू. सत्तेचे परिवर्तन केल्यानंतर विकासाचा प्रश्न असो, आदिवासींचा प्रश्न असो, स्त्रियांच्या संरक्षणाचा प्रश्न असो, बेकार तरुणांचा प्रश्न असो या सगळ्या प्रश्नांमध्ये लक्ष केंद्रित करून एक वेगळा प्रगत आणि यशस्वी महाराष्ट्र दाखवणं हे काम आम्ही लोक निश्चितपणाने करू, हा विश्वास या ठिकाणी मी तुम्हा सर्वांना देतो आणि त्यासाठीच कॉ. गावित यांची उमेदवारी तुम्हा सर्वांसमोर सादर केली. मोठ्या मतांनी तुम्ही त्यांना विजयी करा. असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

कळवणमधून जे.पी.गावित डाव पलटणार; नितीन पवारांना दाखवणार घरचा रस्ता ?

JP Gavit vs Nitin Pawar

JP Gavit : नाशिक : बुधवारी मोठे शक्तिप्रदर्शन करत माकपच्या वतीने माजी आ जे.पी. गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कळवण मतदारसंघातील हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाकडून विद्यमान आमदार नितीन पवार यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे कळवण मतदारसंघात जे.पी.गावित (JP Gavit) विरूद्ध नितीन पवार अशी लढत निश्चित झाली आहे.

गावित विरूद् पवार अशी सतत लढत

मतदारसंघाची पुनर्नविभागणी झाल्यानंतर याठिकाणी जे.पी. गावित (JP Gavit) विरूद्ध माजी मंत्री अर्जुन पवार यांच्याच अटीतटीची लढत बघायला मिळाली आहे. एक वर्ष जे.पी. गावित तर दुसऱ्या वर्षी अर्जुन पवार यांनी कळवण मतदारसंघावर सत्ता स्थापन केली आहे. परंतु मागच्या विधानसभा निवडणुकीपुर्वी ए.टी.पवार यांचं निधनानंतर त्यांचे सुपुत्र नितीन पवार यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीकडे पुन्हा मतदारसंघ आणला.

मोहन गांगुर्डे यांच्यामुळे गावित यांचा मार्ग मोकळा

२०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी, माकप आणि शिवसेना अशी लढत झाली. यात शिवसेनेचे मोहन गांगुर्डे यांना २३,०५२ मत पडल्याने त्याचा फटका जे.पी. गावित यांना बसला. यामुळे नितीन पवार यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. परंतु यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत असलेल्या ठाकरे गटाने माघार घेतल्याने मोहन गांगुर्डे यांनी जे.पी. गावित यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत जे.पी. गावित यांचं पारडं जड मानलं जात आहे.

शरद पवारांचाही पाठिंबा

लोकसभा निवडणुकीत जे.पी. गावित (JP Gavit) यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शरद पवार यांनी माकपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून तडजोड घडवून आणली होती. मात्र तेव्हा त्यांच्याच बिनसलं होते. परंतु अखेरच्या क्षणी गावित यांनी माघार घेतल्याने शरद पवार गटातील उमेदवार भास्कर भगरे यांचा विजय झाला. एका नवख्या शिक्षकाने एका केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार यांचा पराभव केला. त्यात जे.पी. गावित यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्याचवेळी शरद पवार यांनी जे.पी.गावित यांना विधानसभेसाठी शब्द दिल्याची माहिती आहे.

नितीन पवार पराभावाच्या छायेत

दरम्यान, २०१९ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जे.पी.गावित यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. याचदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना घेऊन मुंबईत मोर्चा काढला होता. तर अलिकडेच पेसा भरती संदर्भात केलेले आंदोलन राज्यात चर्चेत आले होते. अशातच जे.पी. गावित यांचे सर्व विरोधक एकत्रित आले आहेत. अलिकडेच एका सभेत शेवटची निवडणूक लढवत असल्याचे जे.पी.गावित यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांचे विरोधक देखील पाठिंबा देतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

Read Also : 

हेही वाचा…”ही गर्दी म्हणजे जणू महायुतीच्या कोथरूडमधील विजयाचा शंखनादच”, चंद्रकांत पाटलांच्या रॅलीला जनतेचा उदंड प्रतिसाद 

हेही वाचा…विधानसभेसाठी शिंदेंचे उमेदवार ठरले; ४५ उमेवारांची पहिली यादी जाहीर 

हेही वाचा…मनसेची पहिली यादी जाहीर ; अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात 

हेही वाचा..”महाराष्ट्रात गुलाबी वादळ घोंगवणार”; अजित पवार गटातील स्टार प्रचाराकांची यादी जाहीर 

हेही वाचा…”मला विचारल्याशिवाय मुख्यमंत्री होणार नाही”, २८८ पैकी १९१ उमेदवार तयार ; महायुतीला थेट चँलेंज