पाच दिवसांत कार्यकर्त्यांचं मॉरल खचलं…! भोसरीत विरोधकांचं ‘कॅल्क्युलेशन’ कुठं चुकलं ?

Spread love

Bhosari Vidhansabha : पिंपरी- चिंचवड : आखाडा कोणताही असो… युद्ध असो… की राजकारण… एकदा का सैनिक-सहकाऱ्यांचे मनोबल खचले, सेनापती एकाकी पडतो. यासाठी प्रत्येक चाल अन्‌ डाव हा राखून आणि पारखून खेळावा लागतो. अत्यंत संयमी आणि अभ्यासू अशी ओळख असलेले भोसरी विधानसभेतील (Bhosari Vidhansabha) महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्याबाबत काही ‘कॅल्युलेशन’ चुकले. पवार यांची सभा झाल्यापासून मविआचे ‘टेन्शन’ वाढले आहे. परिणामी, पाच दिवसांत कार्यकर्त्यांचे ‘मॉरल’ खचले, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

विधानसभा निवडणुकीत भोसरीमध्ये (Bhosari Vidhansabha) महायुतीचे महेश लांडगे आणि महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे यांची लढत तुल्यबळ होईल, असा दावा करण्यात येत होता. किंबहुना, गव्हाणे यांनी गेल्या ३ महिन्यांपासून तगडी लढत दिली. त्यांच्या प्रचाराच्या ‘टेम्पो’चा आलेख वाढता होता. पण, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेली सभा अपक्षेप्रमाणे परिणामकारक झाली नाही. शरद पवार यांच्या सभेत विरोधी पक्षाचा उमेदवार म्हणून महेश लांडगेंचा उल्लेखही झाला नाही. या सभेत शरद पवार ‘वादळी’ बोलतील किंवा मावळात ज्याप्रमाणे काही महिन्यांपूर्वी आमदार सुनील शेळके यांना दम भरला होता. तसे काही हाती लागेल.

याहून उत्तर पुणे जिल्ह्यात झालेल्या सभांमध्ये ज्याप्रमाणे शरद पवार यांचा त्याच दिवशी झंझावात होता. तो भोसरीत (Bhosari Vidhansabha) दिसेल, अशी अपेक्षा होती. महाविकास आघाडी आणि गव्हाणे समर्थकांची उत्सुकता प्रचंड होती. मात्र, सभेत शरद पवार यांनी स्थानिक उमेदवारावर बोलणेच टाळले. त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला. या सभेनंतर मतदार संघातील (Bhosari Vidhansabha) वातावरण खऱ्या अर्थाने महेश लांडगे यांच्या बाजुने झुकले.

दरम्यान, चिखली येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. ही सभा अपेक्षेप्रमाणे परिणामकारक होणार नाही, असाच महाविकास आघाडीचा कयास होता. मात्र, शरद पवारांच्या सभेनंतर महेश लांडगे समर्थकांचे मनोबल वाढले. चिखलीची सभा आक्रमक आणि झंझावाती झाली. या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी प्रलंबित असलेला रेड झोन, प्राधिकरण प्रॉपर्टी फ्री होल्डसह अन्य प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.

तसेच, मुस्लिम समाजाच्या मौलवीचा व्हीडिओ जाहीर सभेत दाखवला आणि हिंदू समाजाला एकजूट करण्याचे आवाहन केले. ही सभा लांडगे आणि फडणवीस जोडीने गाजवली. महेश लांडगे यांच्यादृष्टीने ही सभा राजकीय वातावरण निर्मिचा ‘ट्रेलर’ होती. या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि महायुतीला मोठे बळ मिळाले. ‘फतवा विरुद्ध भगवा’ अशी गर्जना या सभेत करण्यात आली. त्यामुळे महाविकास आघाडी अस्वस्थता आणखी वाढली.

मुख्यमंत्री योगी यांची सभा ‘ब्लॉकब्लास्टर’…

भोसरीतील ऐतिहासिक गावजत्रा मैदानावर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा ‘ब्लॉकब्लास्टर’ ठरली. या सभेला लाखाच्या घरात गर्दी खेचली. किंबहुना, योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे नहीं तो कटेंगे नहीं’ असा हुँकार दिला. यासह ‘काँग्रेस आघाडी समस्या आहे, तर भाजपा महायुती समाधान आहे’ असा दावा करीत आपल्या भाषणात चार-पाच वेळा आमदार महेश लांडगे यांचा उल्लेख केला. जो शरद पवार यांच्या सभेत अजित गव्हाणे यांचा झाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. योगींनी ही सभा गाजवली. प्रचंड गर्दी पाहून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल आणखी खचले.

…अन्‌ खासदार अमोल कोल्हे चिडले!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा भोसरीत झाली. त्यानंतर चिखलीत महाविकास आघाडीने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची सभा नियोजित केली होती. प्रचारसभा सांगता करण्यासाठी अवघे १० मिनिट असताना डॉ. कोल्हे सभास्थळी धावत-पळत पोहोचले. कोल्हे येवू शकणार नाहीत, अशा विचाराने प्रत्येकाची धाकधूक वाढली होती. ती डॉ. कोल्हे यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच बोलून दाखवली. त्यांच्या आगमनामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.

मात्र, प्रेक्षकांमधून आणि व्यासपीठावर स्थानिक नेत्यांकडून येणारा चिठ्ठीचा भडीमार यामुळे खासदार कोल्हे चिडले. भाषण सुरू असतानाच त्यांची चिठ्ठी रागाने फाडून फेकली आणि वेळ संपला त्यावेळी समोर बजून अनावश्यक सूचना करणाऱ्यास खडेबोल सुनावले. यामुळे ही सांगता सभाही महाविकास आघाडीला ‘क्रेडिट’ करता आली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह नेत्यांचे मनोबल खचलेले आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.


Spread love